रायगड जिल्हा
रायगड जिल्हयाला ऐतिहासिक आणि भौगोलिक पाश्र्वभूमी लाभलेली आहे. जिल्हयाचा उत्तर -दक्षिण विस्तार १७० कि.मी. असून पूर्व - पश्चिम विस्तार ७० कि.मी. इतका आहे. अरबी समुद्राच्या तटांवर स्थित असलेला हा रायगड जिल्हा तिन्ही बाजूंनी हिरव्यागार नारळाच्या झाडांनी व उंच पर्वतांनी वेढलेला आहे.
रायगड जिल्हयाला शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून मान प्राप्त झाला आहे. शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणांनी हया भूमिला स्पर्श केलेला आहे. हया अतुलनीय जिल्हयात अजिक्य असा मुरुड जंजिरा किल्ला स्थित आहे. जवळ-जवळ १० छोटे मोठे किल्ले असलेल्या हया रायगड जिल्हयाचे विभाजन १५ तालुक्यांमध्ये केलेले आहे.
“दक्षिण काशी“ म्हणून संबोधले जाणारे हरिहरेश्वर हे ठिकाण रायगडात स्थित आहे. सी. डी. देशमुख व स्वर्गवासी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांसारख्या थोर पुरुषांनी रायगडात जन्म घेतला आहे. आचार्य विनोबा भावे यांचा जन्म गागोदे गावात झाला आहे. या प्रकारे रायगडाला सामाजिक पाश्र्वभूमी देखील लाभली आहे.
औद्योगिक क्षेत्रातही रायगड प्रगती पथावर असून येथील अलिबाग, पनवेल, महाड, उरण तालुक्यांमध्ये हजारो कोटींची औद्योगिक गुंतवणूक आहे. रायगड जिल्हा हा मुंबई लगतचा कोकणातील औद्योगिक जिल्हा असल्याकारणाने भारताच्या कानाकोपर्यातून उदरनिर्वाहासाठी येथे जनता स्थित झाली आहे.
रायगड जिल्हयाला जवळ-जवळ १० कि.मी.चा सागरी किनारा लाभल्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी सतत असते. रायगड जिल्हयात मासेमारीमुळे मोठया प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. शिवाय पर्यटनामुळे येथील अनेक स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.