१९८४ मध्ये जि. प. ची ही भव्य वास्तू तेवढीच देखणी वास्तू समुद्राला साक्षी ठेवून उभी राहिली. “शिवतीर्थ“ असे इमारतीचे नामकरण करण्यात आले. शिव म्हणजे कल्याण व तिर्थ म्हणजे पवित्र पाणी!. या वास्तु मधून सागराप्रमाणे विकासाच्या व जनकल्याणाच्या योजना बाहेर पडाव्यात अशी शिवतीर्था मागची संकल्पना आहे.
इमारती मध्ये जी दालानं आहेत त्यांनाही कै. ना. ना. पाटील, कै. सुरबानाना टिपणीस, अनंतराव चित्रे, ग. भा. पंडीत आदि विभूतींची नावे देण्यात आली आहेत. रायगडाच्या सुपुत्रांनी जिल्ह्याचा इतिहास घडवला आहे.
रायगड किल्ल्याची उभारणी करणारे सुभेदार हिरोजी हिंदाळकर यांनी जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी हिंदोळकर ! असे नाव कोरले आहे. याच धर्तीवर शिवतीर्थाची उभारणी करणार्या प्रभाकर पाटलांचे सेवेच्या ठायी तत्पर पाटील प्रभाकर ! असे नाव प्रवेशव्दारावर कोरण्यात आले आहे.
प्रभाकर पाटलांनी एक तप शिवतीर्थावरुन रायगडचा कारभार चालविला. लोकाभिमुख प्रशासनाचा नवा आदर्श निर्माण केला, त्यामुळेच जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या हृदयात प्रभाकर पाटलांचे नाव कायमचे कोरले गेले आहे.