पर्यटन स्थळे

 

रायगड जिल्ह्यातील देवस्थाने, मंदिरे

शितळादेवी मंदिर -

अलिबाग स्थानकापासून सुमारे १७ किमी. अंतरावर तर चौल नाक्यावरून अंदाजे तीन किमी. अंतरावर पुरातन असे शितलादेवी मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी अलिबाग स्थानकातून अलिबाग-रेवदंडा एसटीने चौलनाका येथे उतरावे लागते. तेथून मंदिरापर्यंत जाण्यासाठी रिक्षांची उत्तम सोय आहे. स्वतच वाहन असल्यास थेट मंदिरापर्यंत जाता येते.

पूर्वीची स्थती लक्षात घेता हे मंदिर चौलच्या दक्षिणेस खाडीजवळ होते. परंतु सद्यस्थतीतील जवळपासची खाडी भरून बरीच जमीन वाढली आहे. या ठिकाणी पूर्वी आंग्रेकालीन लाकडी व कौलारू मंदिर होते. त्याचा १९९० साली जिर्णोध्दार होऊन येथे सिमेंट काक्रेटचे मंदिर उभारण्यात आले. गाभार्‍यात देवीची मूर्ती मूळच्या ठिकाणीच स्थानापन्न आहे. पूर्वाभिमूख मुख्य प्रवेशाराशिवाय उत्तर व दक्षिण बाजूसही प्रत्येकी एक प्रवेशार आहे.

येथील देवीचे स्थान हे जागृत समजले जाते. त्यामुळे या मंदिराला बरेच भाविक पर्यटक आवर्जुंन भेट देतात.

पालीचे श्री बल्लाळेश्वर मंदिर -

अष्टविनायकां पैकी प्रसिध्द श्री बल्लाळेश्वराचे मंदिर रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात पाली येथे आहे. पाली हे सारसगड व अंबा नदी यांच्या मधे वसलेले आहे.

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे कर्जत हे अवघे ३० कि.मी. आहे. अलिबाग पासुनचे अंतर साधारण ६० कि.मी. आहे.
बल्लाळेश्वराची मुर्ती पुर्वाभिमुख आहे, उपरणे व अंगरखा असा ब्राम्हण वेश ल्यायलेला हा अष्टविनायकातील एकमेव गणपती आहे.

महडचे श्री वरदविनायक मंदिर -

अष्टविनायकां पैकी प्रसिध्द श्री वरदविनायकाचे मंदिर रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड येथे आहे. प्राचीन काळी महड हे भद्रक, मढक या नावाने ओळखले जात असे.

वरदविनायक हा भाक्ताच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा व मनोकामना पुर्ण करणारा देव आहे.

पेशव्यांचे सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी साधारण १७३० मध्ये हे मंदिर बांधुन लोकार्पण केल्याचा उल्लेख आहे, मंदिर साध्या बांधणीचे व लहानसे असुन कौलारु आहे.

माघ व भाद्रपद महिन्याच्या सुरवातीचे पाच दिवस येथे मोठा उत्सव असतो. मंदिरा मध्ये १८९२ पासुन नंदादीप सतत तेवत आहे.

श्री विक्रम विनायक मंदिर -

अलिबागपासून सुमारे २० किमी. तर मुरूडपासून ३२ किमी. अंतरावर साळाव या निसर्गरम्य गावी उंच टेकडीवर श्री विक्रम विनायक मंदिर बांधले आहे. या ठिकाणी बिर्ला उद्योग समुहाच्या विक्रम इर्स्पात कंपनीचा भव्य प्रकल्प असून सदर मंदिर बिर्ला उद्योग समूहाने बांधले आहे. पांढर्‍याशुभ्र संगमरवरातून साकारण्यात आलेला मंदिराचा भव्य कळस अती दूरवरूनही नजरेस पडतो. टेकडीच्या पायथ्याशी प्रवेशार आहे. येथून मंदिराकडे जाणारा रस्ता पायर्‍यांचा आहे तसेच पायर्‍यांच्या जवळूनच नागमोडी वळणाचा वाहनांसाठी बनवलेला रस्ताही आहे. मंदिराच्या सभोवताली नयनरम्य बागबगिचा असून त्यातील फुलझाडे रंगीत कारंजी नेत्रसुखद आकर्षक असल्यामुळे मन प्रसन्न होते. मंदिराचा सभामंडप चारही बाजूंनी मोकळाच असून छत पारदर्शक पॉलिकॉप र्शिटचे असल्यामुळे सभामंडपात प्रकाश व मोकळया हवेचा संचार असतो. मंदिराच्या चौकोनी गाभार्‍यात श्री गणेशाची भव्य मूर्ती आहे. बाजूच्या लहान मंदिरातून राधा-कृष्ण शंकर-पार्वती देवी दुर्गामाता आणि सुर्यदेव यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. मंदिराच्या परिसरीतील बागेमध्ये स्व. आदित्य बिर्ला यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. बागेचा परिसर व मंदिर यांतील विद्युत रोषणाई नेत्रदिपक व आकर्षक आहे.

अल्पावधीतच या मंदिराची किर्ती महाराष्टाबाहेर पोहोचल्यामुळे या ठिकाणी भक्तगण तसेच पर्यटक सतत येत असतात. सकाळी ९.०० आणि संध्याकाळी ७.१५ वाजता मंदिरात आरती व पूजा होते. सकाळी ६.०० ते ११.३० व संध्याकाळी ४.३० ते ९.०० या वेळेतच मंदिरात प्रवेश दिला जातो. अलिबागपासून मंदिरापर्यंत तसेच रेवदंडयापासून मंदिरापर्यंत एस.टी. तसेच तीन सहा आसनी रिक्षांची उत्तम सोय आहे. भक्तांना मनशांती व सुख समाधान लाभणारे हे ठिकाण आहे.

श्री दत्त मंदिर (चौल-भोवाळे) -  

अलिबागपासून १६ किमी. अंतरावर तर चौल नाक्यावरून २ किमी. अंतरावर भोवाळे या निसर्गरम्य गावातील गोंगरवजा टेकडीवर हे दत्तमंदिर आहे. डोंगराच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर पायर्‍या पायर्‍यांनी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत विलोभनिय वाटतो.

साधारण पाचशे पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या हाताला एक लहानसा श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी मठ आहे. पुढे साधारण पंचवीस तीस पायर्‍या चढून गेल्यावर श्री दत्त मंदिर विश्रारांती स्थान म्हणून सद्गुरू बुरांडे महाराज समाधी पहावयास मिळते. पुढे सुमारे दिडशे पायर्‍यानंतर सत्चित आनंद साधना कुटी आहे. त्यापुढे हरे राम विश्रामधाम त्यानंतर हरे राम बाबांचे धुनीमंदिर त्यापुढे औदुंबर मठ पहावयास मिळतो. इथपर्यंत आल्यानंतर आधुनिकतेचा स्पर्श झालेल्या दत्तमंदिराच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. मंदिराच्या दक्षिणेला माई जानकीबाई व हनुमानदासबाबा मठ आहे.

दत्तमंदिरातील दत्तमुर्ती त्रिमुखी सहा हात असलेली पाषाणाची आहे. देवळाभोवती प्रदक्षिणेसाठी मोकळी जागा आहे. मुख्य गाभारा थोडासा उंचावर आहे. देवालयाच्या कमानीपासून गाभार्‍यापर्यंत छोटासा जिना आहे. दरवर्षी दत्तजयंतीपासुन पाच दिवस दत्तजयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या पाच दिवसांत फार मोठी जत्रा भरते. सदर दत्तमंदिर आज महाराष्ट व इतरत्र एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे.

चौलचे श्री रामेश्वर मंदिर -

अलिबाग रेवदंडा रोडवर अलिबागपासून सुमारे १४ किमी. अंतरावर प्राचीन असे हे रामेश्वर मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून समोर पुष्करणी आहे. घडीव दगडात बांधलेले हे मंदिर हेमांडपथिय पध्दतीसारखे वाटते. परंतु ते केंव्हा व कुणी बांधले याचा उल्लेख मिळत नाही. सदर मंदिराचा जिणोध्दार अनेकदा झाल्याच्या आंग्रेकालीन नोंदी आहेत.

रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२ मीटर असून मध्यभागी १.५ मीटर लांब रूंद व जमिनिपासून थोडी उंच पितळी पत्र्याने मढवलेली शाळुंका आहे. तिच्या मध्यभागी नेहमीप्रमाणे उंच लिंग नसून चौकोनी खयात स्वयंभू मानलेले शिवस्वरूप आहे. गाभार्‍याच्या जमिनीपासून सुमारे ७. ६२ मीटीर उंच असलेल्या शिखराचे व संपूर्ण गाभार्‍याचे बांधकाम दगडी आहे. गाभार्‍याची संपूर्ण इमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभार्‍याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत. रामेश्वराच्या दर्शनासाठी सभामंडपात उभे राहिले असता उजव्या बाजूच्या कमानीत नारायणाच्या मूर्तीसमोर पर्जन्यकुंड आहे. डाव्या बाजूस कमानीत गणपतीची मूर्ती असून त्याच्या समोर वायुकुंड आहे तर मध्यभागी अग्नीकुंड आहे.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते. महाशिवरात्रीच्या वेळी मोठा उत्सव साजरा केला जातो.

नांदगावचा श्री सिध्दीविनायक -

मुरूडच्या उत्तरेस जवळपास ९ किमी. अंतरावर हे नांदगावचे प्राचीन सिध्दीविनायक मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे समस्त श्रध्दाळूंचे श्रध्दास्थान सोळाव्या शतकातील प्रसिध्द जोतिर्वोद पंचांगकर्ते गणेश दैवज्ञ यांच्या घराण्यांचे सिध्दीविनायक हे आराध्य दैवत होय. अष्टविनायकाच्या दर्शनाची फलश्रुती या गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर पूर्ण होते. अशी गणेशभक्तांची श्रध्दा आहे.

माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला येथे माघी गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा होतो. येथील एकदिवसीय यात्रेचे मोठे आकर्षण असते. दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला असंख्य भक्त सिध्दीविनायकाच्या दर्शनास आवर्जुन येतात.

श्री कनकेश्वर -

अलिबाग पासून सुमारे १३ कि. मी. अंतरावर, शहराच्या इशान्य दिशेला श्री कनकेश्वरचा ९०० फूट उंचीचा डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून देवस्थानाची उंची साधारण १२७५ फूट इतकी होईल.

श्री कनकेश्वराला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक आहे मापगांव मार्गे व दुसरा आहे झिराड मार्गे.

नगमोडी वळणाने पायर्‍यांवरुन चालताना जवळपास ५००० फूट गड चढावा लागतो. पायथ्याशी असलेल्या दत्तमंदिरापासून चढण्यास सुरुवात केल्यावर साधारण १००० फूट अंतर पार केल्यावर उजव्या बाजूस 'मोहनगिरी' व 'बालगिरी' या दोन तपस्व्यांच्या समाध्या आहेत. येथुन साधारण ५०० फूटावर 'नागोबाचा टप्पा' आहे, येथुन ७५० फूटावर 'जांभळीचा टेप' लागतो, पुढे साधारण १०० फूटावर एक पायरी लागते त्यास ’’ देवाची पायरी ’’ असे म्हणतात. नीट निरीक्षण केल्यास या पायरीवर संपुर्ण पावलाचा ठसा दिसतो. या नंतर गायमांडी लागते व येथुन सपाटीचा रस्ता चालु होतो, दक्षिणेकडे सागरगडचा डोंगर व पश्चिमेकडे अरबी समुद्राचे विहंगम दृष्य दिसते. गायमांडीच्या पुढे 'पालेश्वर' हे घुमटीवजा शिवमंदिर आहे. त्याच्या पुढे गेल्यावर 'ब्रम्हकुंड' लागते, शेजारीच मारुती मंदिर आहे, उजव्या हाताला बलराम कृष्ण मंदिर आहे. पुढे अष्टकोनी पुष्करणी असुन त्याच्या पश्चिमेस श्री शंकराचे भव्य मंदिर आहे. देवळाचे बांधकाम यादव घराण्यातील राजे रामदेव यांच्या कारकिर्दीत झाले आहे. श्री कनकेश्वर मंदिराची उंची ५४ फूट आहे. श्री कनकेश्वर हे एक प्राचीन स्वयंभू शिवस्थान आहे.

या ठिकाणी भाविक पर्यटकांच्या रहाण्याची तसेच घरगुती भोजनाची उत्तम सोय आहे.

श्री हरिहरेश्वर -

हरिहरेश्वर हे ठिकाण ’’ दक्षिण काशी ’’ म्हणुन ओळखले जाते, त्याच प्रमाणे येथील समुद्र किनारा पार्यटकांमध्ये प्रसिध्द आहे.

समुद्र किनार्‍यावरच श्री शंकराचे भव्य मंदिर आहे, मंदिराचे बांधकाम काला बद्यल निश्चित माहिती नसली तरी पहिल्या बाजिराव पेशव्यांनी मंदिराचा जिर्णोध्दार केल्याची माहिती आहे.

मंदिरामध्ये ब्रम्हा, विष्णु, महेश व देवी पावेतीच्या मुर्ती आहेत, त्याच प्रमाणे श्री काळभैरव व योगेश्वरी यांच्या मुर्ती देखील आहेत.

मंदिर जरी समुद्र किनार्‍यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरा वरुन व समुद्रा मधुन आहे.